पाणी टंचाईबाबत सर्वांनी सतर्क रहावे- आ. कैलास गोरंट्याल

Foto
जालना : आगामी कालावधीत ग्रामीण भागात उद्भवणार्‍या पाणी टंचाईच्या संदर्भात अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आतापासूनच सतर्क राहून आवश्यक त्या उपाय योजना आखाव्यात, अशा स्पष्ट सूचना देऊन विजेच्या संदर्भात वाढत असलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन सदर अडचणी दूर करण्यासाठी विज वितरण कंपनीने तात्काळ पावलं उचलावीत, असे आदेश आ. कैलास गोरंट्याल यांनी एका बैठकीत दिले.
जालना विधानसभा मतदार संघातील पाणी टंचाई संदर्भात जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जि. प. उपाध्यक्ष महेंद्र पवार, राम सावंत, जि. प. सदस्य बबनराव खरात, यादव राऊत, सोपान पाडमुख, रऊफभाई परसुवाले, कल्याण सपाटे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, गट विकास अधिकारी संजय कुलकर्णी, पं. स. सदस्य कैलास उबाळे, जनार्दन चौधरी, कृष्णा पडूळ, अरुण घडलिंग, समाधान शेजूळ, गणेश खरात, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता ससाणे, नारायण गजर, पाखरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आ. कैलास गोरंट्याल यांनी या बैठकीत उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांकडून गावनिहाय पाणी टंचाईचा आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीलाच कृष्णा पडुळ यांनी पंचायत समिती कार्यालयातर्फे सरपंचांना  आढावा बैठकीसंदर्भात निरोप दिले नसल्याचे सांगून प्रशासनाकडून निरोप न मिळाल्यामुळे बैठकीला मोजकेच सरपंच उपस्थित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पडूूळ यांनी उपस्थित केलेल्या या मुद्यावरुन सरपंचांना निरोप देण्याचे काम तुमचे नाही का? असा सवाल उपस्थित करुन आ. कैलास गोरंट्याल यांनी गट विकास अधिकार्‍यांची बैठकीत चांगलीच कानउघाडणी करत यानंतर अशी हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे बजावले. गावनिहाय घेण्यात आलेल्या आढाव्यातून बहुतांशी गावांना मार्च पर्यंत पाणी पुरेल, इतका साठा असला तरी मार्चनंतर मात्र टंचाईची झळ बसण्याची भिती उपस्थित सरपंचांसह ग्रामसेवकांनी व्यक्त केली. त्यामुळे नादुरुस्त असलेले हातपंप सुरु करुन नवीन हातपंप घेणे, मोटार दुरुस्ती, विहिर अधिग्रहण, पाईप लाईन दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढणे, आडवे बोर घेणे, इत्यादी उपाय योजना हाती घ्याव्या लागतील, अशी अपेक्षा बहुतांशी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी बैठकीत व्यक्त केली. पाणी टंचाईबाबत चर्चा होत असतांनाच अनेक गावच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी गावातील विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगत विज वितरण कंपनीचे अभियंते तक्रारी करुनही गांभीर्याने दखल घेत नाहीत, अशा व्यथा आ. कैलास गोरंट्याल यांच्यासमोर मांडल्या. पाणी पुरवठा योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागातर्फे वापरली जाणारी सोलार योजना अनेक गावात पूर्णपणे फेल गेली असून सोलार पंप काम करत नसल्यामुळे विहिरीतून पाणी उपसा होण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या. नादुरुस्त ट्रान्सफार्मर, अनेक गावातील ट्रान्सफार्मरवर विजेचा भार वाढत असल्यामुळे विज खंडीत होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सावंगी तलाव येथील कमलाकर कळकुंबे या व्यक्तीने सरकारी विहिरीचे पाणी स्वत:च्या शेतात वळवल्यामुळे ग्रामस्थांना सतत पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते, या संदर्भात तक्रारी करुनही प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात आली नाही, याकडेही उपस्थित ग्रामस्थांनी लक्ष वेधले. याप्रकरणी आ. गोरंट्याल यांनी स्वत: गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.
ग्रामपंचायतच्या कामकाजात गांभीर्याने लक्ष न घालणार्‍या ग्रामसेवकांच्या तातडीने इतरत्र बदल्या करण्याचे आदेश आ. गोरंट्याल यांनी पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले. ज्या गावांमध्ये नवीन ट्रान्स्फार्मरची आणि नव्याने पाणी पुरवठा योजना हाती घेण्याची आवश्यकता आहे, अशा गावांचे प्रस्ताव प्राधान्य क्रमाने तयार करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देऊन यासाठी राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही आ. गोरंट्याल यांनी बैठकीत दिली. बैठकीच्या प्रारंभी आ. गोरंट्याल यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे अधिकार्‍यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व आभार गटविकास अधिकारी श्री संजय कुलकर्णी यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी एम. एस. जायभाये यांनी केले. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker